१५ जुलै, २०१५

वारी कुंजरगड-भैरोबा दुर्गाची




या फोटोसाठी आभार : विनित, राहुल आणि प्राजक्ता  

यंदाच्या पावसाळ्यातील भटकंतीची सुरुवात थोड्या आडवाटेवरच्या किल्ल्यांने करायची ठरवलं आणि मग थोडीफार पुस्तकं आणि नकाशे धुंडाळून बागलाण डोंगररांगेतील कुंजरगड उर्फ कोंबडा आणि त्याचा छोटेखानी शेजारी कोथळ्याचा भैरोबा दुर्ग यांची वर्णी लागली.

प्राजक्ता आणि राहुल हे नेहमीचे सवंगडी तर होतेच, त्यात अजून दोन नव्या दमाचे भिडू जमा झाले. एक प्राजक्ताचा मित्र विनीत उर्फ विन्या आणि दुसरा राहुलचा भाऊ विपुल. विपुलने तर खास आदल्या दिवशी नव्या जोड्यांची खरेदी केली. ट्रेकमधे यथावकाश त्या जोड्यांचा पार निकाल लागला तो भाग निराळा. 

शनिवारी सकाळी ६.३० ला निघायचे ठरवले पण, दरवेळी प्रमाणे निघायला उशीर झाला. ७.३० वा. राहुल आणि विपुलला म.न.पा.च्या चौकात त्यांच्या सामानानिशी गाडीत कोंबलं. सकाळी ६.४५ पासून चौकात ताटकळणार्‍या राहुलने माझ्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. त्याला शांत करून पोटातल्या कावळ्यांची शांती करायला गाडी नाशिकरोड वरच्या समर्थ वडेवाल्याच्या पार्किंगला लावली. विनीत त्याच्या मोपेडवरून आला होता. क्षुधाशांती झाल्यावर आम्ही कुंजरगडाच्या पायथ्याच्या विहिर गावाची वाट धरली. 

कुंजरगड पुण्यापासून साधारण १५५ किमी. वर आहे. पुणे-नाशिक हमरस्त्यावर बोटा इथे डाव्या हाताला जाणार्‍या फाट्यावर कोतुळकडे वळलो. कोतुळ गावाबाहेरच्या दत्त मंदिराकडून विहिर-कोथळे कडे जाण्यासाठी एक फाटा फुटतो. १२.१५ ला विहिर गावात उतरते झालो.



विहिर गावातून दिसणारा कुंजरगड आणि त्याच्या शेजारचा प्रशस्त डोंगर 

गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. त्यातील दोन विहिर गावातून किल्यावर जातात तर एक मागल्या बाजूने फोफसंडी गावातून किल्ल्यावर येते. विहिर गावातून एक वाट कुंजरगड आणि शेजारचा एक प्रशस्त डोंगर यांच्या खिंडीमधून वर चढते तर दुसरी त्याच डोंगराच्या धारेवरून गडावर जाते.


भाताच्या खाचरांतून जाणारी वाट. क्षितिजावर कुंजरगड दिसतो आहे. 


वाटेवर लागणारा एक पिटुकला ओढा 

किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून साधारण १४२० मीटर उठवला आहे तर विहिर गावाची उंची साधारण ८६० मीटर आहे. विठ्ठल भांगरेच्या घरासमोर गाड्या लावल्या. विठ्ठलचे चुलते सुरेश मामा आम्हाला गडावर घेऊन जाणार होते. पाण्याच्या बाटल्या आणि थोडा कोरडा खाऊ घेऊन खिंडीची वाट धरली. या वाटेने गडावर जाण्यास साधारण दोन-अडीच तास लागतात. खिंडीच्या थोडं खालच्या अंगाला एका लवणात वाट डावीकडे वळते आणि गर्द झाडोर्‍यात उघड्यावरच विसावलेल्या मारूती आणि काळोबाच्या मुर्त्यांकडे जाते. त्या मूर्त्या पाहून तसेच सरळ अरूंद पायवाटेवरून गडाला वळसा देत आम्ही कुंजरगडावरील प्रसिध्द अशा आरपार भुयारापाशी आलो.


आमचे प्रेमळ मार्गदर्शक "सुरेशामामा" 


खिंडीतून दिसणारं विहिर गाव 


गर्द झाडोऱ्यात विसावलेले मारुतीराया आणि काळोबा 


आम्ही पाच भटके - डावीकडून विपुल, विनित, अस्मादिक, प्राजक्ता आणि राहुल  


वाटेत एका झऱ्यावर पाणपिशव्या भरून घेतल्या 


कुंजरगडाच्या पोटात असलेली गुहा 


आरपार भुयाराच्या तोंडाशी राहुल 

एका मोठ्या चौकोनी गुहेच्या आतल्या भिंतीतून जेमतेम एक मध्यम शरिरयष्टीचा माणूस सरपटत जाऊ शकेल असं भुयार आहे. राहुलने आत डोकावून पाहीलं आणि त्याच्या चेहेर्‍याला गार हवेचा झोत लागला. पलीकडच्या बाजूने हवा आत खेळती होती. राहुल बॅटरी घेऊन आत शिरला. त्याच्या मागे मी होतो. माझ्या सुढृड बांध्यामुळे मी त्या भुयारातून जाऊ शकेन का याबद्दल थोडी चर्चा करून आम्ही ढोपरांवर पुढे सरकू लागलो. राहुल झटकन पलीकडे गेला आणि मला मार्गदर्शन करू लागला. हळूहळू मी आणि माझ्या पाठोपाठ विनीत आणि विपुल देखील आले. ढोपरं आणि गुढगे सोलून निघाले होते पण समोर आलेला नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. विहिर गावाकडची दरी, डाव्या बाजूचा डोंगर आणि त्यावरून डोकावणारे पावसाळी ढग. ते अप्रतिम दृश्य बरेचसे डोळ्यात आणि थोडेसे कॅमेर्‍यात साठवून परत फिरलो.


आरपार गुहेच्या दरी कडल्या टोकाला 


गुहेतून दिसणारा दरीचा नजारा 


राहुल भुयाराच्या एका टोकावर 

तसेच पुढे जाऊन उध्वस्त दरवाज्यातून गडावर पोहोचते झालो. पडझड झालेले अवशेष आपलं स्वागत करतात खरे पण त्यापेक्षा जास्त अस्वस्थ करून जातात. माथ्यावरून उजवीकडे चालत गेलो की पाण्याची तीन टाकी लागतात. शेवटच्या टाक्यातील पाणी पिण्याजोगे आहे.


ढासळलेल्या पायऱ्या आणि दरवाजा 


गडाची उजवीकडची सोंड 


सोंडेवरील पाण्याचं टाकं 


सोंडेच्या टोकवरील पिण्याच्या पाण्याचं टाकं 


ढगात हरवलेला गडमाथा  


पडक्या अवशेषांमध्ये उभा असलेला मारुतीराया 

तिथे थोडी पोटपूजा आटपून आम्ही गडाच्या दुसर्‍या टोकाकडे निघालो. आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. गडाच्या दुसर्‍या टोकाला पाण्याची टाकी आणि पडके अवशेष आहेत. ते पाहून आम्ही ढासळलेल्या तटबंदीतून गड उतरायला घेतला.


गडाच्या माथ्याजवळ असलेली टाकी 


उध्वस्त तटबंदी आणि बुरूज 

पावसामुळे घसार्‍यावरुन पाय चांगलेच घसरत होते. थोडं खाली उतरल्यावर एक पंधरा-वीस फ़ुटांचा खडा रॉकपॅच आडवा आला. त्याच्यावर बरंच शेवाळं साठलं होतं. सुरेश मामा म्हणत होते मागे फिरू, पण राहुलने थोडं पुढे जाऊन पाहिलं. त्याच्या मते आम्ही तो रॉकपॅच उतरू शकत होतो. तो होता तिथेच थांबला. मी त्याच्या जवळ पोहोचून त्याला थोडे होल्ड्स सांगितले. त्याने घेतलेल्या रस्त्यावर त्याला पाच एक फ़ुटांवरुन खाली उडी मारावी लागली. मागे राहिलेल्या प्राजक्ता, विनित आणि विपुलसाठी तो रस्ता योग्य ठरला नसता. मी तसाच थोडा पुढे गेलो, थोडे जास्त होल्ड्स असलेला मार्ग घेतला आणि मग मी आणि राहुलने हळूहळू प्राजक्ता, विनीत आणि विपुलला खाली घेतले. प्राजक्ताचे तर पाय प्रचंड थरथरत होते. अतिशय थरारक असा तो रॉकपॅच आम्ही कोणताही धोका न पत्करता पार केला होता. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असताना थोडीही चूक किंवा अतिउत्साहीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो याचं भान ठेवलं की तुम्ही सुरक्षित राहू शकता. 


वीस फ़ुटांचा खडा रॉकपॅच


रॉकपॅच सुखरुप उतरल्यावर

आम्ही परत कुंजरगड आणि त्याच्या शेजारच्या डोंगरात असलेल्या खिंडीच्या माथ्यावर होतो. आता परत खिंडीतली निसरडी वाट न घेता शेजारच्या डोंगराच्या धारेवरून विहिर गावात उतरणार होतो. या मागे दोन उद्देश होते. एक म्हणजे नवीन वाट पायाखालून जाणार होती आणि दुसरं म्हणजे त्या डोंगराच्या पोटात असलेल्या नैसर्गिक गुहा आम्हाला पाहता येणार होत्या. अजून एक छोटा रॉकपॅच उतरुन समोरच्या धारेला भिडलो. तिथेच फ़ोफ़संडीहून येणारी वाट येऊन मिळते. मागल्या खेपेला ही वाट केली असल्याने यावेळी तिन्ही वाट पायाखालून घालता येणार याचा आनंद वेगळाच होता. पाच-एक मिनिटात आम्ही डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहांपाशी आलो. गावातले स्थानिक लोक या गुहांना "गडद" असाही शब्द वापरतात. या गुहांचा वापर स्थानिक गुरं बांधण्यासाठी करत असल्याने त्या राहण्यायोग्य राहिल्या नाहीत. गुहांसमोरून पुढे गावात जाणारी धरली. 


खिंडीतल्या पठारावर उतरताना लागणारा छोटा रॉकपॅच 


कुंजरगडाशेजारच्या डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहा किंवा "गडद" 



कुंजरगडाशेजारच्या डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहा किंवा "गडद"

या वाटेवर फारसा चिखल आणि खिंडीतल्या सारखा तीव्र उतारही नव्हता. त्यामुळे झपझप पाऊले उचलंत गावाच्या वर असलेल्या शेवटच्या पठारावर आलो आणि तुफ़ान पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वारा देखील होता. थोडं पलीकडे असलेला भैरोबा दुर्ग मात्र मजेत मावळतीची कोवळी उन्हं खात बसला होता. हळूहळू ऊन इकडे सरकू लागलं आणि या विरोधाभासातून मग आमच्या समोरच विहिर गावातून एक दुहेरी इंद्रधनुष्य उठावलं. फार अद्भुत होतं ते सगळं. तो नजारा कॅमेर्‍यामधे साठवायचा प्रयत्न करून गावात पोहोचते झालो. 



मावळतीची कोवळी उन्हं अंगावर घेणारा भैरोबा दुर्ग 


आमच्या डोळ्यांदेखत उठावणारे इंद्रधनुष्य 



सुरेशमामांकडे कोरा चहा घेत दिवसभरातल्या घडामोडींवर चर्चा झडल्या आणि जेवायला विठ्ठलदादाच्या घरी आलो. सकाळपासून नीट असं जेवण झालंच नसल्याने गरमागरम पिठलं, पोळ्या, सांडग्याची भाजी आणि भात अगदी पोटाला तडस लागेपर्यंत खाल्ला. ठसठसणारे पाय आणि पोट तुडुंब भरलेलं असताना एकच गोष्ट होऊ शकते ती म्हणजे गाढ झोप.

सकाळी विनितच्या खुडबुडीने जाग आली. झटपट आवरून आम्ही चहाला सुरेशमामांकडे पोहोचलो. चहा घेऊन निघणार तितक्यात मामांनी पिशवीभर तांदूळ माझ्या हवाली केले. चव म्हणून कोणी पाच किलो तांदूळ का बरे देईल ? पण नाही, त्या माणसांची घडणच निराळी होती. पुढल्या खेपेला आलात की नक्की यायचं या तंबीवर आमची पाठवणी केली. त्यांचं आदरातिथ्य पाहून डोळ्यात पाणीच यायचं बाकी होतं. कसाबसा सुरेशमामांच्या परिवाराचा निरोप घेऊन कोथळ्याकडे निघालो.

कोथळे गावाच्या अलीकडेच एक दिशादर्शक पाटी आहे. तिथे गाड्या लावल्या आणि भैरोबा दुर्गाची वाट धरली. वाट अगदी मळलेली आहे. भैरोबा दुर्ग हा हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई अभयारण्यात येत असल्याची साक्ष जागोजागी पटावी अशी गडद झाडी गडाच्या वाटेवर आहे.


कोथळे गावातून भैरोबा दुर्गावर जाणारा रस्ता 


कोथळे गावातून भैरोबा दुर्गावर जाणारा रस्ता 

हा किल्ला छोटेखानी असल्याने साधारण अर्ध्या तासात आपण वाटेत लावलेल्या शिडीपाशी पोहोचतो. इथे कातळात खोदलेलं थंडगार पाण्याचं टाकं आहे. इथून गडमाथा गाठण्यासाठी कातळभिंतीत खोदलेल्या पावट्या आणि जुनी शिडी दिसते. आपण नव्या डुगडुगत्या शिडीवरुन गडमाथ्यावर पोहोचतो.


गडावर जाणाऱ्या खोदीव पायऱ्या 


वाटेतील पाण्याचे टाके  


शिडीचा मार्ग उजव्या बाजूला जुनी गंजकी शिडी पडलेली दिसतेय 


शिडीच्या वरच्या बाजूला राहुल 

गडाचा माथा आटोपशीर आहे. समोरंच भैरोबाचं ठाणं आहे. त्याच्या समोर एकमेकांना जोडून ३-४ टाकी आहेत. गडाच्या दुसऱ्या टोकालाही अशीच पाण्याची ४-५ टाकी आहेत. त्याव्यतिरिक्त गडावर पाहण्यासारखे असे काही नाही. तरीदेखील गडावर प्रसन्न वाटतं. पावसाळ्यात संपूर्ण गडमाथा टोपली-कारवीने आच्छादलेला असतो. थोडीफ़ार फ़ोटोगिरी करुन गड उतरू लागलो. जेमतेम वीस मिनिटात गाड्यांपाशी पोहोचलो देखील.


टोपली-कारवीने आच्छादलेला गडमाथा 


गडाचा प्रवेश मार्ग 


टोपली-कारवीने आच्छादलेला गडमाथा 


भैरोबाचं ठाणं 


दीपमाळ आणि पाण्याची टाकी 

यंदाच्या पावसाळ्यातील पहिलीच भटकंती दमदार झाली होती. कुंजरगडाचा जीवघेणा निसरडा चढ, पावसाची मस्त साथसंगत, आरपार भुयारातला रोमांचकारी थरार, परतीच्या वाटेवर डोळ्यांदेखत उठावलेलं दुहेरी इंद्रधनुष्य, सुरेशमामांच्या घरचं प्रेमळ आदरातिथ्य आणि भैरोबा दुर्गावरची सुंदर सकाळ. सह्याद्रीने आणि त्यातल्या निसर्गाने दिलेल्या या दानाने भरलेली झोळी घेउन परत फिरायची इच्छाच होत नव्हती. येताना वाटेत पुढल्या ट्रेकचे मनसुबे ठरले हे काही वेगळं सांगायला नकोच. 


!! धन्यवाद !!
या फोटोसाठी आभार : प्राजक्ता, विनित, विपुल, राहुल 

१७ नोव्हें, २०१४

सह्याद्रीतील ग्रँड कॅनियन - सांदण दरी



रतनगड-सांदण दरी असा बेत ठरला आणि म्हणता म्हणता आठ भिडू जमा झाले. शुक्रवारी रात्री साडेदहाला आम्ही नाशिक फाटा सोडला. मुंबईहून अभिजीत पहाटेच्या कसारा लोकलने निघून सकाळी लवकर शेंडी गावात भेटणार होता. पहाटे साडेतीनला आम्ही शेंडीतल्या दत्तमंदिरात आमच्या पथार्‍या पसरल्या. मंदिरात येणार्‍या भक्तांच्या घंटानादाने सगळी लवकरच जागी झाली. चहा नाष्टा उरकतोय तो अभिजीत लालडब्यातून उतरला.




आज सांदणदरी पाहून रतनगडावर मुक्कामाचा बेत होता. हे आपल्याला कितीही सोपं वाटत असलं तरी त्यासारखं घडत नाही याचा अनुभव पुढे आलाच.
भंडारदर्‍याहून साम्रदकडे जाताना अलंग-कुलंग-मदन हे अनोखे दुर्गत्रिकूट सोबत करीत होते. घड्याळाचा काटा साडेनऊ दाखवत होता पण, ऊन्हाच्या काट्याने बाराचा आकडा कधीच ओलांडला होता. ट्रेकच्या नियमाप्रमाणे मधे एकदा वाट चुकायचा कार्यक्रमही झाला. घाटघर आश्रमशाळेच्या फाट्याने आम्हाला फाट्यावर मारले होते. १०.३० वाजता साम्रद गावात पोहोचलो. मी नेहमीच्या गोपाळमामांकडे दुपारच्या जेवणाची व्यवस्था लावायला सटकलो. वाडीमागच्या पठारावरून एक वाट सांदणच्या मुखाकडे जाते. त्या वाटेवर आलो तेव्हा अकरा वाजले होते. सूर्व्या चांगलाच आग ओकत होता. सांदणच्या अरुंद मुखाशी बरी झाडी टिकून आहे.
सांदण सामोरी आली. सांदण ! सह्याद्रीतील एक अजब नवल ! अतिशय विलक्षण आणि एकमेवाद्वितीय भौगोलिक रचना ! इंग्रजीत Geographic Fault Line तर मराठीत भौगोलिक प्रस्तरभंग रेषा अशी याची शास्त्रीय नावे. जमिनीच्या पोटात तीन-चारशे फूट खोलीची आणि सुमारे दीड किलोमीटर लांबीची ही घळई निसर्गाचा अद्भूत असा चमत्कारच आहे. त्याची प्रचिती ही तिथे गेल्याशिवाय यायची नाही.
पावसाळ्यात  घळईतून पाण्याचे अतिशय वेगवान लोंढे कोकणात उतरत असतात त्यामुळे आत जाणे शक्य नसते. हिवाळा संपता पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत आपण घळईच्या टोकाशी जाऊ शकतो.
गर्द झाडोर्‍यातून मुख्यवाटेपासून उजवीकडे आपण घळईत उतरू लागतो. घळईच्या तोंडाशीच बारामाही टिकणारा पाण्याचा झरा आहे. बाजूलाच एक जनावरांसाठीचा पाणवठा आहे. मी तर त्या झर्‍यावर अक्षरशा: आडवाच पडलो. पाण्याची चव अफलातून होती. त्या झर्‍याचे थंडगार अमृत यथेच्छ पिऊन झाल्यावर आम्ही दरीत उतरू लागलो. सुरुवातीलाच एक अजस्र धोंडा आडवा येतो. त्याच्या उजव्या अंगाने निमुळती वाट खाली उतरते.




दरीतील थंडावा वरील पठारावरच्या तापमानात चार ते पाच अंशाची घट झाल्याची पावती देतो . संपूर्ण दरी लहान मोठ्या धोंड्यांनी भरलेली आहे. घळईची रुंदी कधी पाच फूट तर कधी पंधरा फूट ! पुढे जाताना दोन ठिकाणी वाट पाण्यातून पार करावी लागते. पहिल्या जागी पाणी गुडघाभर तर पुढल्या टप्प्यात कमरेएवढे पाणी असते. हिवाळ्याच्या सुरवातीला तर पाण्याचा स्तर छातीपर्यंत असतो. हे पाणी भलतेच थंड असते. पायाला मुंग्या लागण्या इतपत थंड !
वाटेत एका बेचक्यात एक जखमी वाघूळ टकामका आमच्याकडे पहात पडून होते.





त्या निसर्गनवलाचे कितीही फोटो काढले तरी कमीच वाटत होते. घळई तिच्या टोकापाशी थोडी रूंद होते आणि दगडधोंड्यांचा आकारही वाढतो. तिथे अस्ताव्यस्त पसरलेल्या या दगडधोंड्यांवरूनच पावसाळ्यात होणार्‍या घळईच्या अक्राळ-विक्राळ रूपाची कल्पना येऊ शकते. दरीच्या टोकावरून खाली कोकणात उतरणारी एक अवघड वाट आहे. ती पुढे जाऊन करवली घाटाच्या वाटेला जाऊन मिळते. पण या वाटेने उतरण्यासाठी प्रस्तरारोहणाची आणि त्यासाठी लागणार्‍या साहित्याची आवश्यकता आहे. अनावश्यक धाडस टा़ळावे. परत जाताना पाय निघण्यास तयार नव्हते. तसेच पाय ओढत त्या भारलेल्या दरीतून आम्ही साम्रद गाठले तेव्हा तीन वाजले होते. गोपाळमामांनी जेवणाची ताटं लावायला घेतली. वांगंबटाटा रस्सा, भाकरी, भात, आमटी आणि झणझणीत ठेचा असा फक्कड बेत जमून आला होता. जेवताना गोपाळमामांशी झालेल्या गप्पांत कळले की गावची जत्रा असल्याने रतनगडावर तळीरामांची गर्दी असणार आहे. येथे आमच्या रतनगडावर  मुक्कामाच्या बेताला पहिला सुरूंग लागला. त्यात प्राजक्ताचा पायही दुखावला होता.
रतनगडाला पर्याय म्हणून जवळच्याच कोकणकड्याला भेट देण्याचं ठरवलं आणि गाड्या घाटघरच्या धरणाकडे दामटल्या.घाटघरच्या बंधार्‍यात यथेच्छ डुंबून झाल्यावर सूर्यास्ताचा नजारा पहाण्यासाठी कोकणकड्यावर गेलो. डाव्या-उजव्या बाजूला सणसणीत उंचीचे कडे, त्यांच्या तळात विसावलेल्या कोकणातल्या वाड्या, करवली घाटाची वाट आणि या सगळ्यांवर आपली लाल केशरी माया उधळणारा सूर्यनारायण. केवळ अद्भूत !





अजून एक रम्य संध्याकाळ आठवणींच्या खात्यात जमा करून साम्रदमधे परतलो. अंधार आणि थंडी सोबतच वाढत होते. येताना सहज नजर वर गेली आणि आकाशात पसरलेला चांदणचुरा डोळ्यात भरला. ठरलं! आजची रात्र उघड्यावर झोपायचं, जिथे हे नक्षत्रांचं दालन पहाटेपर्यंत कधीही डोळे उघडले तरी पाहता येऊ शकेल. गावापासून जवळंच एका शेताडीत गाड्या काटकोनात लावल्या आणि मध्यभागी झोपण्यासाठी जागा साफ करून घेतली. एका बांधाच्या आडोश्याला चूल पेटवली आणि खिचडी रटरटू लागली.आम्ही सगळेच तार्‍यांच्या रंगपटात हरवलेली नक्षत्रे शोधत बसलो होतो. थंडीने कुडकुड वाढवल्यावर सगळे आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरले. 
सकाळी लवकर उठून आम्ही रतनवाडीकडे निघालो. रतनवाडीत असणारे अमृतेश्वराचे मंदिर म्हणजे हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावर आणि आतल्या खांबांवर प्रचंड प्रमाणात कोरीवकाम, यक्षकिन्नरांच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन आणि इतर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मंदिराच्या बाजूलाच एक दगडी पुष्करणी आहे विष्णूतीर्थ नावाची. यात विविध प्रकारच्या मूर्ती आणि कोनाडे आहेत.





सांदण ! एक निसर्गनवल, सह्याद्रीतली एक जरा हटके जागा, जमिनीच्या पोटातली थंडगार वाट, घळीतला ऊन-सावलीचा थरार, हात-पाय गोठवणारी पाण्यातली वाटचाल, ऊन्हाचे कवडसे लेऊन सोनेरी झालेले घळीतले दगड अश्या अनेक आठवणी काखोटीला मारून रतनवाडी सोडलं खरं, पण लवकरच परत येण्याच्या बोलीवर !